24 वर्षांचं पोरगं पांढरी दाढी लावून फिरत होतं विमानतळावर, खतरनाक होता प्लॅन पण…

दिल्ली: परदेशात राहायला किंवा पैसे कमवायला जायची अनेकांना क्रेझ असते. काहींना परदेशातलं झगमगाटातलं आयुष्य खुणावत असतं, त्यामुळे काहीही करून त्यांना देश सोडून जायचं असतं. ते परदेशात जाण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. काही जण कायदेशीर मार्गाने परदेशात जाऊ शकत नसतील तर त्यासाठी ‘डंकी’सारखे बेकायदा मार्ग स्वीकारतात. काही जण तर फ्रॉड करूनही परदेशात पोहोचतात. असंच एक प्रकरण दिल्ली विमानतळावर उघडकीस आलं आहे. 24 वर्षांचा एक तरुण 67 वर्षांचा म्हातारा असल्याचं भासवून कॅनडात जाण्याचा प्रयत्न करत होता; पण तो पोलिसांच्या तावडीत सापडला. एअरपोर्टवर घडलेली ही घटना काय आहे.

एका चुकीमुळे पकडला गेला
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफने बनावट पासपोर्ट असलेल्या एका व्यक्तीला पकडलं. आरोपी एका वृद्धाच्या गेटअपमध्ये आला आणि विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना फसवून विमानाने देशाबाहेर जाण्याच्या तयारीत होता. ही व्यक्ती कोणत्या तरी रॅकेटचा भाग तर नाही ना, याचा तपास आता दिल्ली पोलिसांसह सर्व यंत्रणा करत आहेत.

दिल्ली एअरपोर्टवर तैनात असलेल्या सीआयएसएफ कर्मचाऱ्याने टर्मिनल 3 च्या चेक-इन एरियात संशयाच्या आधारावर आरोपीला चौकशीसाठी थांबवलं होतं. आरोपीची वेशभूषा संशयास्पद वाटल्याने प्रोफायलिंग आणि बिहेवियर डिटेक्शनच्या आधारे त्याचं स्कॅनिंग करण्यात आलं, तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला. चौकशीत त्याने त्याचं नाव रशविंदर सिंह सहोता असं सांगितलं, तसंच वय 67 वर्षं असल्याचं सांगितलं होतं. तो रात्री 10.50 वाजता एअर कॅनडाच्या फ्लाइटने दिल्लीहून कॅनडाला जात होता.

आरोपीला तपासासाठी डिपार्चर एरियात नेण्यात आलं. तिथे त्याच्या मोबाइलच्या तपासणीत फोटो गॅलरीत दुसऱ्या पासपोर्टची सॉफ्ट कॉपी सापडली. त्यावर अशी माहिती होती – पासपोर्ट नंबर V4770942, भारतीय नाव – गुरू सेवक सिंह, वय 24 वर्षं (जन्मतारीख : 10.06.2000)

म्हणजेच तो तरुण होता पण फसवणूक करून परदेशात जाण्यासाठी तो वेषांतर करून म्हातारा झाला होता. वय वाढलेलं दिसावं यासाठी त्याने केस आणि दाढी पांढरी केली आणि चष्मा लावून एअरपोर्टवर गेला; पण त्याच्या आवाजामुळे आणि मेकअपमुळे त्याचं बिंग फुटलं आणि तो पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

Read More

Recent Posts