हरयाणा : मानेसर इथं ॲमेझॉन कंपनीचं वेअरहाउस आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जास्त काम करायला लावलं जात असून, त्यांना टॉयलेटला जाण्यास व पाणी पिण्यास मनाई करण्यात येतेय, अशी बातमी समोर आली. यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सक्रिय झाला आहे. आयोगाने या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. आयोगाच्या मते, जर मीडियातील बातम्या खऱ्या असतील तर हे कामगारांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन असून, ते कामगार कायद्यांच्या विरोधातही आहे. आयोगाने केंद्र सरकारला आठवडाभरात उत्तर देण्यास सांगितलं आहे.
एनएचआरसीने या प्रकरणाच्या प्रोसिडिंग्जमध्ये म्हटलंय की मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानेसर येथील ॲमेझॉनच्या गोदामात कर्मचाऱ्यांना अमानवी वागणूक दिली जात आहे. एका 24 वर्षीय कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ॲमेझॉनमध्ये कर्मचाऱ्यांना नियमितपणे शपथ घेण्यास सांगितलं जातं की ते त्यांना दिलेले काम पूर्ण होईपर्यंत टॉयलेटला जाणार नाहीत किंवा पाणी पिणार नाहीत. कर्मचाऱ्यांना मोठ्या ट्रकमधून माल उतरवावा लागतो. उन्हामुळे पॅकेज उतरवण्यात खूप अडचणी येतात. सतत काम करूनही हे कर्मचारी एका दिवसात फक्त चार ट्रक रिकामे करू शकतात.
सहा ट्रक रिकामे करण्याचं टार्गेट
एनएचआरसीच्या प्रोसिडिंग्जमधील माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या टीमला दररोज 24 फूट लांबीचे सहा ट्रक रिकामे करण्याचं टार्गेट देण्यात आलं आहे. 30 मिनिटांच्या चहाच्या ब्रेकनंतर कर्मचाऱ्यांना सतत काम करण्यास सांगितलं जातं. टार्गेट पूर्ण करेपर्यंत ते टॉयलेटला जाणार नाहीत आणि पाणी पिणार नाहीत, अशी शपथ त्यांना घ्यायला लावतात. मागच्या महिन्यात वेअरहाउसच्या ‘इनबाउंड टीम’ला किमान आठ वेळा ही शपथ घ्यायला लावली होती.
रेस्ट रूम नाही
मानेसर प्लांटमधील एका महिला कर्मचाऱ्याने माहिती दिली की, वेअरहाउसमध्ये आराम करायला जागा नाही. त्यांना टॉयलेटमध्ये बसून, आराम करावा लागतो. एका कर्मचाऱ्याने सांगितलं की त्यांना आठवड्यातून 5 दिवस आणि रोज 10 तास काम करावं लागतं, यासाठी महिन्याला 10,888 रुपये पगार मिळतो. त्यांना चहा आणि दुपारच्या जेवणासाठी दररोज 30-30 मिनिटांचा ब्रेक मिळतो. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीनिअर त्यांच्यावर लक्ष ठेवतात आणि ते टॉयलेट किंवा इतर जागेवर वेळ घालवत नाहीत ना, हे तपासत राहतात.
कंपनीने फेटाळले आरोप
ॲमेझॉन इंडियाने हे आरोप फेटाळले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटलं की ते या आरोपांची चौकशी करत आहेत. “आम्ही या दाव्यांची चौकशी करत आहोत. पण आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना असं कोणतंही काम करण्यास सांगणार नाही, हे स्पष्ट आहे. अशी कोणतीही घटना आमच्या लक्षात आल्यास ती आम्ही त्वरित थांबवू. यात सहभागी मॅनेजर्सना पुन्हा ट्रेनिंग देऊ,” असं प्रवक्ता म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.