राजधानी दिल्लीत मृत्यूचा तांडव! 48 तासांत 50 मृतदेह सापडले; 9 दिवसांत 192 जीव गेले; घडतंय काय?

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मृत्यूचा तांडव सुरू आहे. गेल्या 48 तासांत 50 मृतदेह सापडले, 9 दिवसांत 192 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीत असं काय घडत आहे की लोकांचा जीव जातो आहे?

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 48 तासांत दिल्लीच्या विविध भागांतून वंचित सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील 50 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, बुधवारी इंडिया गेटजवळील चिल्ड्रन पार्कमध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

त्याच वेळी, बेघर लोकांसाठी काम करणा-या ‘सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट’ या एनजीओने दावा केला आहे की, 11 ते 19 जून दरम्यान दिल्लीत 192 बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे.

सुरक्षा रक्षक, भिकारी किंवा वंचित वर्गातील लोकांच्या अनैसर्गिक मृत्यूंबाबत फोनवरून माहिती मिळत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी

गेल्या दोन दिवसांत 22 रुग्णांना केंद्रीय राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात आणण्यात आलं. आरएमएल हॉस्पिटलमध्ये उष्णतेमुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून 12 ते 13 रुग्ण लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत.

सफदरजंग रुग्णालयात एकूण 60 रुग्ण आले होते, त्यापैकी 42 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. मंगळवारी मरण पावलेल्या 60 वर्षीय महिला आणि 50 वर्षीय पुरुषासह सहा मृत्यूंची नोंद हॉस्पिटलमध्ये झाली आहे.

लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एकाच्या शरीराचे तापमान 107 पर्यंत वाढत होतं. त्याचा उपचारादरम्यान 15 जून रोजी मृत्यू झाला. तो सुमारे 39 वर्षांचा होता, तो एक मोटर मेकॅनिक होता, जनकपुरी येथे त्याच्या दुकानात काम करत असताना बेशुद्ध पडला. त्याला रूग्णालयात आणलं तेव्हा खूप ताप होता.

मृत्यूचं कारण काय?

रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, पीडितांना इतर कोणताही आजार नाही. असे लोक रुग्णालयात येतात तेव्हा त्यांच्या शरीराचं तापमान नोंदवलं जातं. जर ते 105 अंश फॅरेनहाइटपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं आणि इतर कोणतंही कारण नसेल तर त्यांना उष्माघाताचा त्रास झाल्याचं घोषित केलं जातं. उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना उष्माघाताचे संशयित रुग्ण म्हणून घोषित केलं जातं. दिल्ली सरकारची एक समिती आहे जी नंतर मृत्यूची पुष्टी करते.

दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात, बाह्य रुग्ण विभागात (OPD) दररोज उष्माघाताची 30 ते 35 प्रकरणे नोंदवली जात आहेत. रूग्णालयाच्या अंतर्गत औषध विभागाचे अध्यक्ष डॉ. अतुल कक्कर म्हणाले, ओपीडीमध्ये वैद्यकीय सुविधांमध्ये उष्णतेशी संबंधित आजारांशी संबंधित साप्ताहिक 30 ते 35 प्रकरणे नोंदवली जातात. यामध्ये स्नायू पेटके आणि थकवा यासारख्या परिस्थितींचा समावेश आहे.

उष्माघाताची लक्षणं काय?

उष्माघाताच्या लक्षणांबद्दल बोलताना रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने रुग्ण काही वेळा बेशुद्ध पडतात. त्यांनी सांगितलं की त्यांना खूप ताप आहे, ज्यामुळे शरीराचं तापमान 106 ते 107 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत पोहोचतं.

अतिउष्णतेमुळे ल्युपसचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा परिणाम त्वचा, सांधे आणि किडनी तसेच इतर अवयवांवर होत आहे. ल्युपसने ग्रस्त असलेल्या लोकांना तापमानात वाढ झाल्यामुळे लक्षणे वाढतात.

दिल्लीतील तापमान किती?

उन्हाचा कडाका कायम असताना उष्माघाताने जीव गमावणाऱ्यांची संख्या आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तीव्र जलसंकटाचा सामना करणाऱ्या दिल्लीत कमाल तापमान 43.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा चार अंशांनी जास्त आहे. शहरातील किमान तापमान 35.2 अंश सेल्सिअस होते, जे 1969 नंतरचे जूनमधील उच्चांक आहे. जे सामान्यपेक्षा 8 अंशांनी जास्त होतं. बुधवारी दिल्लीतील 12 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

Read More

Recent Posts